"प्लॅस्टीकनं भरलेलं वासरू"
योगेश गुरवंने केला कॅमेराबद्ध

     म्हसळा येथील सिस्केप संस्थेच्या गिधाड संवर्धन केंद्रात गिधाडांना अन्न पुरवताना एका मृत वासराला भापट येथील ढोरटाकीवर टाकण्याचा योग आला. खरं तर हे वासरू महाड येथील तांबडभुवन येथे तडफडून मेलं होतं. तो वाचावा म्हणून योगेश गुरव व तांबड भुवनमधील तरूण सहकारी खूप प्रयत्न करीत होते. पण तो अक्षरश तडफडून मेलाच. तरूणांनी ते वासरू टेम्पोत घालून सफर केंद्राकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ते जाताना मेलंच. ते का मेलं याचा उलगडा काही कुणाला आलाच नाही.
      ते मृत जनावर म्हसळा येथील ढोरटाकीवर नेल्यानंतर गिधाडांचे एकमेव खाद्य असल्याने ते त्यांनी फ्स्त केलं की नाही याचा मागमूस सिस्केपचे कार्यकर्ते घेत असतात. एकदा मृत ढोर टाकून ते थांबत नाही, पुन्हा त्या जागी दोन तीन दिवसांनी जाऊन गिधाडांनी ते खाल्ल की नाही हे ते पाहतात. त्याप्रमाणे योगेश गुरव आणि सिस्केपचे कार्यकर्ते भापटच्या त्या ढोरटाकीवर गेले होते.
      त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांना शाॅकच बसला होता. गिधाडांनी त्या मृत वासराचे मांस संपवले होते पण त्याच्या पोटात असलेला प्लॅस्टीकचा कचरा मात्र तसाच फुगलेल्या अवस्थेत होता. योगेशचा कॅमेरा अशावेळी पेटणार नाही तर तो योग्या कसला. खरं तर योगेशही पेटला होता. संतापला होता. आपण नेमकं काय करतोय. प्लॅस्टीकचा कचरा सहजपणे कचराकुंडीवर आपण टाकून देतो, घरातील ओला कचरा प्लॅस्टीकच्या पिशवीत टाकून गाठ मारून ती कचराकुंडीत टाकून देतो आणि ते अन्न खाण्यासाठी मोकाट जनावरे कचराकुंडीवर येतात. तो कचरा खाताना प्लॅस्टीकही खातात हे या मृत वासराने दाखवून दिले होते.
      योगेशने ते चित्र काही ठराविक लोकांना पाठविले. त्यात मीही होतो. ते पाहिल्यावर मी देखील सुन्न झालो होते. ताबडतोब एक पोस्टर माझ्या हातून तयार झाले होते. योगेशचा फोटो देखील एका फोटोग्राफीच्या स्पर्धेत गेला आणि त्या फोटोन आऊट आॅफ बाॅक्स या विषयांतर्गत त्या मृत वासराचा फोटो राष्ट्रीय पातळीवर झळकला.
       हा फोटो म्हणजे प्लॅस्टीक कचरा टाकणा-यांना एक अंजन आहे. पण त्याकरीता देखील तितकं डोळस असायला पाहिजे. मला वाटतं तितकं डोळस आज कोणी असेल तर तो अशा प्रकारे प्लॅस्टीक कचराकुंडीवर टाकणार नाही. आणि यातून काही समजले नाही जगामध्ये डोळसांधपणा वाढलाय हे नक्कीच.
     महाडमधील योगेश गुरवने काढलेला हा फोटो महाक्ष2017 या एका राष्ट्रीय पातळीवरच्या फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शन साठी प्रसिद्ध असलेल्या स्पर्धेतील आऊट आॅफ बाॅक्स या सदराखाली पहिल्या क्रमांकाने झळकला आहे. योगेश गुरवचे अभिनंदन आणि या फोटोद्वारे त्याने सर्वांचे डोळे उघडल्याबद्दल अधिक अभिनंदन.

Post a Comment

Previous Post Next Post